नंदुरबार : सामाईक शेतातील निलगीरीचे झाड कापले, या कारणातून पिता-पुत्राला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाल्याही घटना चोपडापाडा (जमाना ता. अक्कलकुवा ) येथे घडली. तसेच मयताच्या कुटुंबियांनाही जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात खुन व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nandurbar Murder News
अक्कलकुवा तालुक्यातील जमाना चोपडापाडा (जमाना) येथे वास्तव्यास असलेले शंकर गुलदारसिंग पाडवी व त्यांचे वडील गुलदारसिंग पाडवी हे दोघे पिता-पुत्र शेतातील निलगीरीचे झाड कापत होते.
झाड कापण्याच्या कारणातून पृथ्वीसिंग करमसिंग पाडवी, विरसिंग पृथ्वीसिंग पाडवी या दोघांनी हाताबुक्क्यांसह कुन्हाडीने मारहाण करीत शंकर पाडवी यांना जखमी करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच पृथ्वीसिंग करमसिंग पाडवी, वीरसिंग पृथ्वीसिंग पाडवी, दिनेश पृथ्वीसिंग पाडवी, रविदास पृथ्वीसिंग पाडवी या चौघांनी हाताबुक्क्यांसह लाथेने गळा व गुप्तागांवर मारहाण करुन गुलदारसिंग पाडवी यांना जीवे ठार केले.
तसेच कुटुंबियांना जीवेठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ केली. याबाबत शंकर गुलदारसिंग पाडवी यांनी मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भा.न्या.सं.चे कलम १०३ (१), १०९ (१), ३५१ (३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.