BR Gavai : भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती बी.आर. गवई १४ मे रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.
विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बी.आर. गवई यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली.
न्यायमूर्ती गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी शपथ घेण्याची अपेक्षा आहे. न्यायमूर्ती गवई यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ असेल.
न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा परिचय
बी.आर. गवई यांना १४ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई यांच्या कुटुंबाला आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभला आहे. भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई हे आंबेडकरी चळवळीतले सक्रीय नेते होते. ते राज्यसभेचे खासदारही होते. रामकृष्ण गवई यांनी केरळ आणि बिहारच्या राज्यपालपदाची धुराही सांभाळली होती.
२४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे जन्मलेले गवई १६ मार्च १९८५ रोजी वकिली क्षेत्रात दाखल झाले. ऑगस्ट १९९२ मध्ये न्यायमूर्ती गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. २००० मध्ये त्यांना नागपूर खंडपीठासाठी सरकारी वकील म्हणून नामांकन देण्यात आले.
त्यांनी नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून काम पाहिले. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईतील प्रमुख पदावर आणि नागपूर, छ. संभाजीनगर आणि पणजी येथील खंडपीठांमध्ये विविध खटल्यांचे अध्यक्षपद भूषवले. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती देण्यात आली.