रायगड : जेवणात विष टाकून पाच जणांचा जीव घेणाऱ्या आरोपी सुनेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रायगडच्या महड गावातील ही घटना असून, प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे असे आरोपी सुनेचे नाव आहे.
रायगडच्या महड गावातील एका घरात वास्तूशांती कार्यक्रमानिमित्त बनवलेल्या जेवणातून ८६ जणांना विषबाधा होऊन, पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना 2018 साली घडली होती. दरम्यान, सासरच्यांकडून होणाऱ्या छळातून सूनेनच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. तत्कालीन तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास करण्यात आला होता. अखेर या प्रकरणातील आरोपी सुनेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी सुन ज्योती सुरवसे हिचे सुरेश सुरवसे याच्याशी दुसरे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच सासरच्यांकडून तिचा छळ करण्यात येत होता. याचाच रागातून सुन ज्योती सुरवसे हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपी सुन ज्योती सुरवसे हिने वास्तुशांतीच्या दिवशीच किटकनाशक औषध आणले होते. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिने जेवणात किटकनाशक औषध टाकले होते.
ज्योती हिचा गावातील लोकांवरही राग होता म्हणूनच तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले होते. अखेर या प्रकरणातील आरोपी सुनेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.