नंदुरबार : जिल्ह्यात पाळीत गायी, बैल आणि म्हैस चोरीला जाण्याचे प्रकार कमी आहेत. गेल्या काही वर्षात अशा घटना घडल्या आहेत. या घटनानंतर शेतकरी तथा पशुपालक पोलिस ठाण्यात फिर्यादही देत आहेत. परंतु पाळीव गुरे परत शोधून देण्यात पोलिसांना मात्र गेल्या पाच वर्षांत यश आलेले नाही.
शेतीवर उदरनिर्वाह चालणाऱ्या नागरिकांची नंदुरबार जिल्ह्यातील संख्या ही साधारण ६७ टक्के आहे. ग्रामीण भागातील बहुतांश जनतेची गुजराण ही शेती तसेच शेतीपूरक कामांवर होते. यामुळे ग्रामीण भागात घरोघरी आजही पाळीव गुरे आहेत. यात गायी, बैल, म्हशी तसेच पाळीव शेळ्यांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गुरांसोबत शेळीपालन करण्यावर शेतकरी भर देतात. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या तीन तालुक्यात गावठी प्रजातीची गुरे आणि शेळ्या पालनाचा व्यवसाय आहे. या भागातून गत पाच वर्षात गुरे व शेळ्या चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.
चोरीला गेलेली गुरे व शेळ्या पुन्हा परत मिळून आल्याचे अद्याप समोर आलेले नाही. यात शेळ्या आणि बोकड चोरीचे प्रकार नियमित सुरु आहेत. यामुळे दोन पैसे गाठीला येऊन उदरनिर्वाह करणाऱ्या पशुपालकांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यामुळे पोलीस दलाने पशुधन चोरीचे गुन्हे गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात शेळ्या व बोकड चोरीचे सर्वाधिक गुन्हे
गत पाच वर्षात शेळी व बोकड चोरीचे सर्वाधिक गुन्हे १२ पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले पशुधन परत मिळाले नसल्याने पशुपालकांचे नुकसान झाले आहे. शेतातून किंवा घराच्या गोठ्यातून ही चोरी झाली आहे. तळोदा येथे गत वर्षी बैल चोरीचे दोन गुन्हे घडले होते. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात बैलजोडी चोरीचे गुन्हे घडले होते.
उदासीनतेमुळे अनेकजण पोलिसात फिर्याद देणेही टाळतात
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये लाख रुपयांपर्यंतचे पशुधन चोरीला गेल्याच्या फिर्यादी नोंदविल्या जातात. परंतू याठिकाणी होणारी विचारपूस आणि कागदोपत्री कारवाईला कंटाळून अनेक जण फिर्याद देणेही टाळतात. ज्यांनी फिर्याद दिली त्यांच्याकडूनही विचारणा केल्यावर योग्य उत्तरे मिळत नसल्याने पुढील काळात विचारपूस करणे बंद केली जात असल्याचे पशुपालकांकडून सांगण्यात आले.