Mumbai Central Terminal : भारतीय रेल्वेचे जनक आणि मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मुंबई सेंट्रल टर्मिनस’ चे नामकरण ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ असे करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी ‘नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समिती’च्या वतीने काल हजारो समर्थकांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन परिसरात निदर्शने केली.
नाना शंकरशेठ यांच्या पुढाकारामुळे १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वे धावली. त्यांचा रेल्वे प्रकल्पातील मोलाचा वाटा लक्षात घेता, मुंबईतील एका प्रमुख टर्मिनसला त्यांच्या नावाने ओळख मिळावी, अशी भावना लोकांमध्ये असून, यासाठी संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे.
यापूर्वी २०२० सालीही राज्य सरकारमार्फत या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. परंतु ‘मुंबई सेंट्रल’च्या जागी शिवसेनाप्रणीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे नाना शंकरशेठ यांच्या नावाने टर्मिनसचे नामकरण करण्याचा आग्रह आणखी तीव्र झाला आहे.
या निदर्शनादरम्यान पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार अॅड. जयप्रकाश बाविस्कर, अॅड. मनमोहन चोणकर, धनराज विसपुते, हेमंत कुडाळकर, डॉ. विवेक राईकर, नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मागणीला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला असून, केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.