इंधन तेल वाहून नेणाऱ्या बोटीला आग लागल्याने एक दुर्दैवी अपघात झाला आहे. मोटार चालवणारी लाकडी बोट आग लागल्यानंतर नदीत उलटली. या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर अजूनही बेपत्ता आहेत. लोकांचा शोध सुरू आहे. या अपघातावेळी बोटीवर ५०० लोक होते. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात प्रवासी जीव वाचवण्यासाटी नदीत उड्या मारताना दिसतायत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास ५०० जण या बोटीतून प्रवास करत होते. आगीच्या घटनेनंतर बोटीवर गोंधळ उडाला आणि लोकांनी नदीत उड्या मारल्या. अनेकांना पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला.
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मोटारवर चालणाऱ्या भलीमोठ्या लाकडी बोटीला आग लागल्यानंतर ही बोट उलटली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत १४८ जण मृत्युमुखी पडले आहेत. आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी असलेल्या कांगो नदीत ही दुर्घटना घडली.
बोटीला आग कशी लागली?
स्वयंपाकासाठी बोटीवर चूल पेटवली गेली. चुलीतून निघालेल्या ठिणगीने संपूर्ण बोटीला वेढले. ही आग बोट चालविण्यासाठी ठेवलेल्या पेट्रोलच्या डब्यांपर्यंत पोहोचली, ज्यामुळे मोठा धमाका झाला. या धमक्यांमुळे संपूर्ण बोट आगीच्या विळख्यात सापडल्याचं सांगितले जात आहे.
या बोट दुर्घटनेत आतापर्यंत १५० जण गंभीररित्या होरपळले आहेत. मात्र, त्यांना सुरुवातीला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय किंवा इतर मदत मिळालेली नाही. यातील १०० जणांना मबांडाका येथील टाउन हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या केंद्रात ठेवले आहे. मात्र, तेथील सुविधा अपुऱ्या आहेत. गंभीररित्या भाजलेल्या काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले आहे.