Cloud Burst in Jammu Kashmir : रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये अचानक पूर आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली. रामबनच्या बनिहाल भागात ढगफुटीमुळे पूर आला. या पुरात डोंगराचे ढिगारे गावाकडे वाहून आले. या अचानक आलेल्या पुरात अनेक घरे पाण्यात वाहून गेली. ज्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच, अनेक लोक त्यांच्या घरात अडकले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. यामळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामबन जिल्ह्यातील बनिहाल भागात अनेक ठिकाणी ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने अडकली आहेत. किश्तवार-पद्दर रस्ता देखील बंद आहे. येथे वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हवामान स्वच्छ झाल्यानंतरच महामार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, धरम कुंड गावात अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे ४० घरे कोसळली आहेत. जलाशय ओसंडून वाहून गेल्याने अनेक वाहने वाहून गेली आहेत.
अनेक घरे कोसळली
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी (२० एप्रिल) सकाळी रामबन जिल्ह्यातील बनिहाल भागात अचानक ढग फुटले. यामुळे मोठा पूर येऊन डोंगराचा ढिगारा गावाकडे आला. अनेक घरे जमिनीवर कोसळली. जोरदार प्रवाहात अनेक घरे वाहून गेली.
ढिगाऱ्यात वाहने अडकले
भूस्खलनाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये डोंगराचा ढिगारा रस्ते आणि निवासी भागात वाहून आल्याचे दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये तीन-चार टँकर आणि काही इतर वाहने पूर्णपणे ढिगाऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. याशिवाय हॉटेल्स आणि घरे देखील ढिगाऱ्याखाली कोसळल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले दुःख
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, रामबनमध्ये झालेल्या दुर्दैवी भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे खूप जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मला खूप दुःख झाले आहे. या काळात माझ्या संवेदना बाधित कुटुंबांसोबत आहेत. आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. जेणेकरून गरज पडेल तिथे त्वरित बचाव कार्य सुनिश्चित करता येईल.