जळगाव : शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव बसने दिलेल्या जबर धडकेत पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना अमळनेर तालुक्यात रविवारी घडली. लता मुरलीधर पाटील असे मृत महिलेचे नाव असून, मुरलीधर राजाराम पाटील असे जखमी पतीचे नाव आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे मुरलीधर राजाराम पाटील व लता मुरलीधर पाटील हे दाम्पत्य वास्तव्याला होते. पाटील दाम्पत्य रविवारी सकाळी दुचाकीवर दहिवद येथील शेतात निघाले होते. मात्र, शेतात पोहचण्याआधीच त्यांना काळाने गाठलं. चोपड्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या यावल आगाराची बस (क्रमांक एमएच २० बी एल २६५६) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
५० ते ६० फूट फरफटत नेले
या अपघातात बसने दुचाकीसह दाम्पत्याला तब्बल ५० ते ६० फूट फरफटत नेले. यात लताबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुरलीधर पाटील यांना अमळनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुष जातीचा सांगाडा सापडल्याने खळबळ
जळगाव : तालुक्यातील आमोदा बुद्रुक येथे गिरणा नदीच्या किनारी एका पुरुष जातीचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आमोदा बुद्रुक गावचे पोलीस पाटील यांना ग्रामस्थांनी नदीकिनारी सांगाडा असल्याची माहिती दिली. याबाबत पोलीस पाटील यांनी तालुका पोलीसांना कळविले. तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय अहिरे, हेकॉ किरण आगोणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मोबाईल फॉरेन्सिक टीमने डीएनएसाठी सांगाड्यावरील नमुने घेऊन राखीव केले आहेत.
तर इतर तपासासाठी सांगाडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या सांगाड्याचे अंदाजित वय ६० ते ६५ असून डोके, छातीचा भाग, एक हात, एक पाय मिळून आला आहे. अंगावरील कपड्यांचे तुकडे सापडले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अहिरे तपास करीत आहेत.