BCCI Update : बीसीसीआयने पुरुष संघाच्या केंद्रीय करारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, यात अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेषतः यंदा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी यादीतून वगळलेल्या दोन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा केंद्रीय करारात समावेश केला आहे. गेले एक वर्ष या खेळाडूंसाठी चढ-उतारांनी भरलेले होते. गेल्या वर्षी दोघांनाही बीसीसीआयच्या २०२३-२४ च्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशांतर्गत क्रिकेट न खेळणे. वास्तविक, बीसीसीआयच्या आदेशानुसार, राष्ट्रीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागते. पण गेल्या वर्षी हे दोन्ही खेळाडू असे करणे टाळताना दिसले.
गेल्या वर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावरून परतल्यानंतर इशान किशन वैयक्तिक कारणांमुळे दीर्घ विश्रांतीवर गेला होता. बोर्डाच्या आदेशाला न जुमानता, इशान किशन त्यावेळी उर्वरित रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये खेळला नाही आणि तो बडोद्यात सराव करताना दिसला. त्यानंतर बीसीसीआय त्याच्यावर नाराज दिसत होते.
दुसरीकडे, श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे रणजी सामन्यांपासून दूर राहिला होता. पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी बीसीसीआयला ईमेलद्वारे सांगितले होते की अय्यर ‘तंदुरुस्त’ आहे, त्यानंतर गोंधळ उडाला आणि त्यांनी केंद्रीय करारही गमावला.
यानंतर, दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे सुरू ठेवले. अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी पाच सामन्यांमध्ये ४८० धावा केल्या. त्यानंतर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. यानंतर, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगला खेळ केला आणि टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. तो २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
दुसरीकडे, झारखंडकडून खेळताना इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही शानदार खेळी केल्या. यानंतर, त्याने आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून आपला दावा मजबूत केला. आता त्याचे लक्ष टीम इंडियामध्ये परतण्यावर असेल.
मिळणार ‘या’ सुविधा
बीसीसीआय केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंची पूर्ण काळजी घेते. इतर खेळाडूंप्रमाणे, आता या दोन्ही खेळाडूंनाही बीसीसीआयच्या सेंट्रल ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये मोफत उपचारांची सुविधा मिळेल. याशिवाय प्रवास भत्ता देखील दिला जाईल.