---Advertisement---

National Khelo Master Games-2025 : न्याहलीचे धावपटू एकनाथ माळी यांना सुवर्णपदक

---Advertisement---

नंदुरबार : दिल्लीच्या कॉमन वेल्थ मैदानावर नुकत्याच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय खेलो मास्टर गेम्स-२०२५ स्पर्धेत न्याहली (ता. नंदुरबार) येथील एकनाथ भगवान माळी यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांची श्रीलंकेत होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. National Khelo Master Games-2025

या स्पर्धांचे आयोजन खेलो मास्टर गेम्स असोसिएशनतर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत न्याहली गावाचे सुपुत्र खेळाडू एकनाथ माळी यांनी एक सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक पटकावले आहे. महाराष्ट्र संघाचा सदस्य असलेले एकनाथ माळी हे ४५ वर्षांवरील गटात झालेल्या स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळविले. तसेच ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक जिंकून दिले आहे. या कामगिरीच्या आधारे सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय खेलो मास्टर स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे .

या स्पर्धेत देशभरातील सुमारे २२ राज्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन दिल्ली राज्याचे भाजपाध्यक्ष वीरेंद्र सजदेव यांनी केले. या स्पर्धेत देशभरातील सुमारे २५०० खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण १२० खेळाडूचा समावेश होता. महाराष्ट्र संघाने स्विमिंग, ॲथलेटिक्स, कबड्डी, हॉकी, टेबल टेनिस, १० मीटर रायफल शूटिंग, बास्केटबॉल ह्या सर्व खेळांमध्ये यश संपादन केले.

यापूर्वी एकनाथ माळी हे दोन वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियन देखील राहिले आहेत. या यशाबद्दल त्यांना वसई विरार महानगरपालिकेतर्फे सन २०२३ व २०२४ ला गौरविण्यात आले आहे. माळी यांनी मुंबई, ठाणे, शिर्डी, अमरावती, नाशिक येथे असे जवळपास ४० मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत आणि बर्‍याच मॅराथॉनमध्ये त्यांनी विजेतेपद मिळविले आहे. ते पालघर जिल्हा माळी समाज उन्नती मंडळाचे सदस्य देखील आहेत.

एकनाथ माळी हे न्याहली येथील सेवानिवृत लाईनमन भगवान माळी यांचे सुपुत्र आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी व मुकेश माळी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. एकनाथ माळी हे मुंबई येथे रेल्वे सुरक्षा बल विभागात महानिरीक्षक सह-प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पश्चिम रेल्वे, चर्चगेट कार्यालयात कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष क्षितिज ठाकूर, उपाध्यक्ष पंकज ठाकूर, खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन पालघर जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, हेमंत म्हात्रे, प्रकाश वनमाळी, रेल्वे विभाग आणि गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment