IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ दरम्यान एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या हंगामाच्या सुरुवातीला काही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी त्यांच्या घरच्या मैदानाच्या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे नावही समाविष्ट होते. त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले होते. यात दोन दिग्गजांना त्यांची स्पष्टवक्ते, विधाने महागात पडताना दिसत आहेत. खरं तर, बंगाल क्रिकेट असोसिएशनने (CAB) बीसीसीआयला पत्र लिहून ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यांमध्ये या दोन्ही दिग्गजांना समालोचन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
आज सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. याआधी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डौल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगाल क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे मागणी केली आहे की, या दोन्ही समालोचकांना ईडन गार्डन्सवर समालोचन करण्याची परवानगी देऊ नये. खरंतर, खेळपट्टीच्या वादावर, या दोन्ही दिग्गजांनी कोलकाता नाईट रायडर्सनी त्यांचे होम ग्राउंड कोलकाताऐवजी दुसऱ्या शहरात बनवावे असे सुचवले होते. दरम्यान, ईडन गार्डन्सच्या हेड पिच क्युरेटरच्या टीकेविरुद्ध सीएबीने ही मागणी केली आहे.
हर्षा भोगले आणि सायमन डौल यांनी कोलकात्यातील ईडन गार्डन्सचे पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने कारवाई केली आहे. दुसरीकडे, हर्ष भोगले म्हणाले होते की, ‘जर ते घरच्या मैदानावर खेळत असतील तर त्यांना त्यांच्या गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी मिळायला हवी.’ मी केकेआर क्युरेटरचे काही विधान पाहिले. जर मी केकेआर कॅम्पमध्ये असतो तर मी त्याच्या विधानावर खूप नाराज झालो असतो. म्हणजे, प्रत्येक संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर काही फायदा मिळाला पाहिजे. यामुळे स्पर्धा आणखी रोमांचक होईल.