CSK Playoff Chances: रविवारी मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नई संघाचा आयपीएल २०२५ मधील सहाव्या पराभव होता. मुंबई इंडियन्सने त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नईचा पराभव केला. या हंगामात मुंबईचा हा सलग तिसरा विजय नोंदवत एकूण चार सामने जिंकले आहेत, तर चेन्नईने ८ पैकी ६ सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की चेन्नई सुपर किंग्ज या हंगामात प्लेऑफसाठी कसे पात्र ठरेल? त्याबद्दलची सर्व समीकरणे आपण जाणून घेऊ
सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, चेन्नईच्या संघाने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. म्हणजेच त्यांचे फक्त ४ गुण आहेत. परंतु रविवारी मुंबई इंडियन्सकडून ९ गडी राखून झालेल्या पराभवानंतर, त्यांचा नेट रन रेट खूपच खराब झाला आहे. सीएसकेचा नेट रन रेट आता -१.३९२ आहे ज्यामुळे सीएसके या वर्षी आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.
उर्वरित सर्व सामने जिंकणे
चेन्नई संघाने ८ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. सहाव्या सामन्यातील पराभवामुळे, संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. चेन्नईचा संघ अजूनही पात्रतेच्या शर्यतीत असला तरी, आता चेन्नईला उर्वरित सहा सामने सलग जिंकावे लागतील. जर त्यांनी सर्व सहा सामने जिंकले तर त्यांचे १६ गुण होतील. कोणत्याही संघाला पात्र होण्यासाठी फक्त १६ गुणांची आवश्यकता असते. परंतु चेन्नईला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की त्यांना त्यांचा रन रेट वाढवावा लागेल. कारण शेवटी, अनेक संघांमध्ये बरोबरी झाल्यास, नेट रन रेट हा निर्णायक ठरेल
१४ गुण मिळवूनही प्लेऑफसाठी पात्र का?
चेन्नई सुपर किंग्ज १४ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते, परंतु त्यानंतर नेट-रन रेटचा विचार केला जाईल. १४ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जना ६ पैकी ५ सामने जिंकावे लागतील. जर चेन्नईच्या संघाने आणखी दोन सामने गमावले तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. गेल्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा संघ १४ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. गेल्या हंगामात त्यांनी पहिल्या आठ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला होता. परंतु, त्यांनी शेवटचे सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते.