नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी सायंकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती अर्थात् सीसीएसची बैठक पार पडली. अडीत तास चाललेल्या या बैठकीत पहेलगाल हल्ल्याचा निषेध करीत पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईचा श्रीगणेशा करण्यात आला. दरम्यान आज, गुरूवारी सर्वदलीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसी यांनी पत्रपरिषद घेऊन निर्णयाची घोषणा केली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी जम्मू-काश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील अतिरेकी हल्ला झालेल्या बैसरन या ठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत दहशतवादापुढे मुळीच झुकणार नाही आणि हल्ला करणाऱ्या एकालाही सोडणार नसल्याचा शब्द पीडित कुटुंबीयांना दिला.
शाह यांनी मृतकांना आदरांजली वाहिली, कुटुंबीयांचे सांत्वन करताना शाह म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना झालेले दुःख हे शब्दांत मांडता येणार नाही, असे ते म्हणाले.
चार दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी
हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात् एएनआयने सुरू केला असून, गुप्तचर यंत्रणांकडूनही अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे. लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटच्या चार दहशतवाद्यांची छायाचित्रे जारी करण्यात आली. यापैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत. दोघा स्थानिक दहशतवाद्यांची नावे आदिल गुरी आणि आसिफ शेख असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बैठकीतील निर्णय
- सिंधू पाणी करार स्थगित
- अटारी-वाघा बॉर्डर बंद
- पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश
- नवी दिल्लीतील पाकिस्तानातील दुतावासातील संरक्षण, लष्करी, नौदल, हवाई सल्लागारांना एका आठवड्यात भारत सोडावा लागणार
- भारतही पाकिस्तानातील संरक्षण, लष्करी, नौदल, हवाई सल्लागारांना परत बोलावणार आहे.