जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. पण, आता सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार असून, नेमकी किती रुपयांनी घसरण झालीय? चला जाणून घेऊया.
मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने दोन हजार रुपयांनी वधारून ९९ हजार ३०० रुपये प्रति तोळा झाले. त्यानंतर दुपारी त्यात ५०० रुपयांची घसरण झाली. मात्र, संध्याकाळी पुन्हा २०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिरावले. मंगळवारच्या संध्याकाळच्या भावानुसार जळगाव सुवर्णपेठेत एक तोळे सोने जीएसटीसह एक लाख एक हजार ३५० रुपयांवर पोहोचले होते.
बुधवार, २३ रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३००० रुपयांची घसरण झाली. यामुळे हा दर एक लाख एक हजार ३५० रुपयांवरुन ९८ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार ७५० रुपयांनी घसरण होऊन हा दर ९२ हजार ९०० रुपयांवरुन ९० हजार १५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला.
दरम्यान, आज गुरुवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ८८,५५३ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९६,६०० रुपये प्रति १० इतका आहे. तर चांदीमध्ये एक हजार १०० रुपयांची वाढ होऊन ती ९७ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. त्यातच सोन्यात येत्या काही वर्षात मोठ्या घसरणीचे संकेतही काही तज्ज्ञ देत आहेत.
वाढीचे काय आहे कारण
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे सोने भावाला दररोज नवी झळाळी पाहायला मिळाली. चीनने डॉलरची विक्री करत सोने खरेदी करणे वाढविल्याने सोने भावात तेजी येत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.