अटारी : पहलगाम घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध ५ कडक पावले उचलली आहेत. ज्यात अटारी सीमा बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर पाकिस्तानी नागरिकांची त्यांच्या देशात जाण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.
अटारी सीमेवरील एकात्मिक तपासणी नाकादेखील लष्कराने बंद केला आहे. अटारी सीमा हा दोन्ही देशांमधील व्यापाराचा एकमेव भू-मार्ग आहे. अमृतसरपासून फक्त २८ किमी अंतरावर असलेले अटारी हे भारतातील पहिले भू-मार्ग आहे. हे बंदर १२० एकरमध्ये पसरलेले आहे आणि ते थेट राष्ट्रीय महामार्ग-१ शी जोडलेले आहे.
पाकिस्तानी नागरिकांनी काय म्हटले?
अटारी सीमेवरून भारतात प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी भारत सरकारने ४८ तासांची मुदत दिली आहे. यामुळे अटारी सीमेवर अनेक पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतत असल्याचे दिसून आले. यावेळी काही पाकिस्तानी नागरिकांनी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर काही पाकिस्तानी नागरिक शांततेबद्दल बोलताना दिसले.
कराचीहून भारतात आलेल्या एका कुटुंबाने सांगितले की, आम्ही १५ तारखेला कराचीहून आलो आहोत. ४५ दिवसांसाठी व्हिसा होता, पण आता भारत सरकारच्या आदेशानुसार, आम्ही आमच्या देशात परत जात आहोत. जे काही घडले ते चुकीचे होते, पण ते कोणी केले किंवा कोणाच्या आदेशाने घडले हे आपण सांगू शकत नाही.
दिल्लीत राहणाऱ्या या पाकिस्तानी नागरिकांनी मानवता आणि बंधुत्वाचे आवाहन केले आणि सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील लोक एकमेकांना भेटत राहावेत अशी आमची इच्छा आहे. द्वेषाने काहीही साध्य होणार नाही. पाकिस्तानात विवाहित असलेली एक महिला भावुक झाली आणि म्हणाली की, माझे लग्न पाकिस्तानात झाले आहे. यामुळे, भारतात वारंवार प्रवास होतो. आम्ही फक्त नातेसंबंध टिकवण्यासाठी आलो होतो. आता जे घडले त्याबद्दल आम्हाला दुःख आहे, पण आम्ही काहीही बोलू शकत नाही.