जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरात आकाश पंडित भावसार (वय 27, रा. अशोक नगर, जळगाव) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शनिवार, ३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, जळगाव शहरातील अशोक नगरात आकाश पंडित भावसार (वय 27) हा कुटुंबियांसह वास्तव्याला होता. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, शनिवार, ३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाश याची पाच संशयितांनी निर्घृण हत्या केली.
संशयितांनी थेट घर गाठलं अन्…
आकाशच्या पत्नीचे मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि तीन अनोळखी इसम असे पाच जण दोन स्कुटीवर आकाशच्या घरी आले. त्यांनंतर आकाशबद्दल विचारणा केली असता त्यांना तो “श्री प्लाझा, ए वन भरीत सेंटर” जवळ असल्याचे कळले. संशयित आरोपी लागलीच श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले. श्री प्लाझा परिसरात संशयित आरोपींनी आकाशला घेरून धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आकाशसोबत असलेले दोन तरुण हे घाबरून गल्लीबोळात पळून गेले. त्यानंतर संशयित आरोपही आकाश याला जबर मारहाण करून पसार झाले. आकाश याला कुणाल सोनार यांच्या मदतीने तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, वैद्यकीय पथकाने तपासणी अंतीमृत घोषित केले.
या प्रकरणी आकाश याची आई कोकिळाबाई पंडित भावसार (वय 54) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वात सफोनी साजिद मंसूरी करीत आहेत.
दरम्यान, संशयित आरोपी अजय मंगेश मोरे हा आकाशच्या घरी अधूनमधून येत होता. त्याचं वारंवार घरी येणं आकाशला पटत नव्हतं. यातून आकाशसोबत अजय याचे वादविवाद झाले होते. या कारणावरून अजय मोरे याने सूडबुद्धीने त्याच्या साथीदारांसह मिळून आकाशला जीवे ठार मारले, असा आरोपही फिर्यादी कोकिळाबाई भावसार यांनी केला आहे.