जळगाव : पाचोरा तालुक्यातील शेतकरी दांपत्य अरुण मोतीराम पाटील व पत्नी सरुबाई पाटील यांच्या लग्नाला नुकतेच ५३ वर्ष पूर्ण झाले. या पार्शभूमीवर मुले वाल्मिक पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनी पुस्तक तुला करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित केली. तालुक्यातील ८ वाचनालये आणि अभ्यासिकांना ही पुस्तके भेट देण्यात आली.
वाल्मिक आणि लक्ष्मण यांनी सांगिलते की, लहानपणी शेतात राबताना आई-वडिलांची गरिबीची परिस्थिती जवळून पाहिली, खूप शिकून मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने त्यांना रोखले. आई-वडिलांचे संस्कार आणि मिळालेल्या शिक्षणाच्या बळावर वाल्मिक शिक्षक झाला तर लक्ष्मण पोलीस खात्यात नोकरीला लागला. आपण मोठे अधिकारी होऊ शकलो नाही, मात्र आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे आणि आपल्या पालकांचे नाव उंचावावे, अशी इच्छा असल्याने पुस्तक तुला करण्यात आली.
यावेळी वाल्मिक पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनी आई-वडिलांचे गंगापूजन केले, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करीत समाज प्रबोधन केले. इतकंच नव्हे तर गाव पंगत देत वडिलांच्या वजनाइतके पुस्तक शहरातील ८ वाचनालय आणि अभ्यासिकांना भेट दिले.
अन् कटू सत्य त्यांनी ओळखले
दरम्यान, शेतकरी कुटुंबातील मुले वाल्मीकराव व लक्ष्मणराव यांना आई-वडिलांनी ज्या पद्धतीने शिकवलं, त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून शिक्षक व पोलीस यांनी कुठलाही गाजावाजा न करता इतर गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तीळ इतकी जबाबदारी घेतलेली पाहायला मिळते. अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्याने शिक्षणापासून आणि आपल्या ध्येयापासून वंचित राहावे लागते हे लक्ष्मणराव आणि वाल्मीकराव यांनी सोसलेले पाहायला मिळते. आपल्या जीवनाच्या शिक्षणामध्ये पुस्तक दुसऱ्याकडून उधार घेऊन मग परीक्षा द्याव्या लागतात. हे जीवनाचे कटू सत्य त्यांनी ओळखले आणि वडील अरुण मोतीराम पाटील व आई सरुबाई पाटील यांच्या ५३ व्या लग्न वाढदिवसनिमित्त पुस्तक तुला करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित केली.