Munir Ahmed CRPF Wife : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईनंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) एका बडतर्फ सैनिकाबाबत वाद निर्माण झाला आहे. खरं तर, बडतर्फ सैनिक मुनीर अहमद यांनी मीनल खान या पाकिस्तानी महिलेशी लग्न केले होते मात्र, याबद्दल त्यांनी विभागाला माहिती दिली नसल्याचा दावा केला जात आहे.
सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) एम दिनाकरन म्हणाले, मुनीर अहमद यांनी मीनल खान या पाकिस्तानी महिलेशी लग्न केले मात्र, त्यांनी याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत मुनीर अहमद यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले मुनीर अहमद?
मुनीर अहमद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत सांगितले, “मी २०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झालो. ३१/१२/२०२२ रोजी मी लग्नाबाबत विभागाला पत्र लिहिले आणि तपशील दिला. विभागाने आक्षेप घेतला. लग्नाची वेळ आणि ठिकाण मागितले. मी विभागाला सर्व तपशील दिले.”
मुनीर अहमद म्हणाले, “माझ्याबद्दल असे म्हटले जात आहे की, मी इंस्टाग्राम-फेसबुकवर भेटल्यानंतर लग्न केले, मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे लग्न अरेंज् मॅरेज आहे. ती माझ्या आईच्या चुलत भावाची मुलगी आहे, म्हणजेच माझ्या मामाची मुलगी आहे. कौटुंबिक संबंध आहेत. फाळणीच्या वेळी माझे कुटुंब विभाजित झाले होते. आम्ही ते योग्य ठरवले आहे. मला न्याय मिळावा, पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे. माझ्या पत्नीचा व्हिसा पुनर्संचयित करावा, जेणेकरून आम्ही पती-पत्नी एकत्र राहू शकू, असे आवाहनही त्यांनी केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काय म्हणाले मुनीर अहमद?
मुनीर अहमद म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, सरकारने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या निर्णयांचेही मी कौतुक करतो. पहलगाममध्ये जे घडले ते कोणीही सहन करू शकत नाही. मी पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर कारवाईची मागणी करतो, जेणेकरून भविष्यात सर्वांना धडा मिळेल.