नंदुरबार : तापमान घसरले असले तरी उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. किमान तापमानातही वाढ होऊन ते २७ अंशांवर गेले आहे.
दरम्यान, बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज कायम असून जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील काही गावांमध्ये पावसाचा हलकासा शिडकावा झाला. गेल्या आठवड्यात सर्वाधिक ४३.८ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. रविवारपासून तापमानात बदल होऊन कमाल तापमान घसरले.
रविवारचे तापमान ३६ अंशांवर आले होते तर सोमवारी तापमान एक अंशाने वाढून ते ३७ अंशांवर गेले होते. किमान तापमानात देखील वाढ होऊन ते २४ वरून २७ वर पोहोचले होते. आर्द्रता मात्र वाढली आहे. त्यामुळे घामाच्या धारांनी हैराण करून सोडले आहे. वाऱ्याचा वेग देखील वाढला असून ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.
ऊन वाढल्यामुळे दूध आटलं
तळोदा : गेल्या काही वर्षात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढले आहेत. त्या तुलनेत दुधाला मिळणारा दर कमी असल्याने पशुपालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले असून, दुधाळ जनावरे पोसणे पशुपालकांसाठी कठीण झाले आहे.
जिल्ह्यात तुलनेने सर्वाधिक दुधाळ जनावरे शहादा परिसरातील गावांमध्ये आहेत. दैनंदिन निघणाऱ्या दुधाची विक्री खासगी डेअरीत केली जाते किंवा घरोघरी जाऊन मिळेल त्या दराने दूध विकावे लागत आहे. पशुखाद्याचे दर वाढले असताना दुधाला समाधानकारक दर मिळत नसल्याने पशुमालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सध्या म्हशीच्या दुधाला प्रती फॅट ५ ते ६ रुपये असा दर मिळत असून, तो न परवडणारा असल्याचे पशुमालकांचे म्हणणे आहे. किमान डेअरींमध्ये दुधाला योग्य भाव मिळण्याची मागणी होत आहे. तापमान वाढीमुळे दुधाळ जनावरांकडून मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण घटले आहे. त्यातच दुधाला समाधानकारक दर मिळणे अशक्य झाल्याने जनावरे पोसणे कठीण झाले आहे. पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, पशुपालकांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
पशुमालकांकडून डेअरीमध्ये आणून दिल्या जाणाऱ्या दुधाला ‘फॅट’ नुसार दर दिला जात आहे. दुधाचा दर्जा चांगला असल्यास अधिक दर दिला जातो. थोडी अधिक रक्कम स्वीकारून त्याच दुधाची घरोघरी विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दुधाळ जनावरं पोसणे पशुपालकांना जिकरीचे होत आहे.