Stock market: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी रात्रीच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)’अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ९ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात पाकिस्तानातील १००हून अधिक दहतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
या घटनेनंतर पाकिस्तानी शेअर बाजारात ६% टक्क्यांची घसरण झाली होती. आता प्रश्न असा निर्माण होतो की याचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल? या हल्ल्याच्या दिवशी भारतीय बाजार काही काळ मजबूत होता, परंतु लष्करी कारवाईनंतर गुंतवणूकदार (Investors)सावध झाले आहेत. या तणावामुळे बाजाराला नुकसान होईल की बाजार अशा परिस्थितीसाठी आधीच तयार आहे? तसेच गुंतवणूकदारांनी या परीस्थितीत काय करावे या बद्दल जाणून घेऊया…
भारत पाकिस्तान युद्धात बाजार
भारत आणि पाकिस्तानमधील मागील संघर्षांदरम्यान बाजाराच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास, १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान निफ्टी ३६.६ टक्के वाढला होता. १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला. त्या दिवशी निफ्टी १४ टक्के घसरला. २०१६ दरम्यान उरी स्ट्राइक झाला. या काळात निफ्टी ०.४ टक्के वाढला. उरी स्ट्राइकनंतर १ वर्षानंतर, निफ्टी ११.३ टक्के वाढला होता.
यावेळची परिस्थिती काय ?
यावेळी बाजार केवळ सीमापार तणावाकडेच नाही तर ब्रिटनसोबतच्या व्यापार कराराकडे आणि संभाव्य अमेरिका आणि युरोपियन युनियन करारांकडेही पाहत आहे. कापड, ऑटो पार्ट्स आणि रसायने यासारख्या क्षेत्रांबद्दल अपेक्षा अधिक दृढ होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, “अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे, उत्पादनात भारताचा वाटा पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता जास्त आहे.
तथापि, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या सुरुवातीच्या वाढीनंतर, नफा बुकिंग झाली आणि माझगाव डॉक, भारत डायनॅमिक्स सारख्या समभागांमध्ये घट झाली. यामुळे हे देखील स्पष्ट झाले की गुंतवणूकदार आता केवळ थीमवरच नव्हे तर वाढ आणि मूल्यांकनावर देखील लक्ष केंद्रित करत आहेत.
यादरम्यान,सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफआयआयने पुन्हा भारतीय बाजारावर विश्वास दाखवला आहे. मे महिन्यात FIIने आतापर्यंत ₹४४,००० कोटींपेक्षा जास्त किमतीची गुंतवणूक केली आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीत SIP तसेच एकरकमी गुंतवणूक करू शकतात. तुमची गुंतवणूक हळूहळू वाढवा. टॉप अप करा, घाबरून विक्री करू नका आणि SIP थांबवू नका.
टीप : वरील दिलेली माहिती ही तज्ज्ञांचे वैयक्तिक विचार आहेत. तरुण भारत लाईव्ह याची पुष्टी करत नाही. शेअर बाजार, म्यूचुअल फंडात गुंतवणूक करण्याआधी बाजाराचा अभ्यास करा व तुमच्या तज्ञांचा सल्ला घ्या.