---Advertisement---

अजून काहीतरी मोठं घडणार? पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना ट्रम्प यांनी दिल्या ‘या’ सूचना

---Advertisement---

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली असून भारतावर प्रतिहल्ला करू अशी धमकी दिली आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने गुरुवारी रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न हाणून पाडला. याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराकडून लाहोरमध्ये पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली.

दोन्ही देशातील तणावपूर्ण स्थिती पाहता अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना सूचना दिल्या आहे. अमेरिकेने गुरुवारी ८ मे रोजी पाकिस्तानातील लाहोरमधील त्यांच्या सर्व वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना तात्काळ तेथून निघून जाण्याचे किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. लाहोरच्या मुख्य विमानतळाजवळील काही भाग अधिकारी रिकामे करू शकतात असे प्राथमिक अहवालही वाणिज्य दूतावासाला मिळाले आहेत.

पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जर सुरक्षितपणे निघणे शक्य असेल तर अमेरिकन नागरिकांनी सक्रिय संघर्षाच्या क्षेत्रातून निघून जावे. जर तेथून निघणे सुरक्षित नसेल तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी राहावे.” असे आवाहन अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना केले आहे.

अमेरिकन दूतावासाने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना ही तातडीची सूचना दिली आहे. यामुळे लाहोर किंवा इतर शहरांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर अमेरिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे अमेरिकन अधिकार्यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment