Operation Sindoor: काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा संबंध असल्याचे उघड झाले होते. या संदर्भात भारताने बुधवारी पाकिस्तान आणि बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय लष्करी आणि नागरी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. बुधवारपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते, ज्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली, तसेच त्यांचे चार हवाई तळ आणि अनेक लष्करी तळांचे नुकसान केले. यासंदर्भातील छायाचित्र आणि व्हिडीओ प्रसारित झाले होते. नामुष्की टाळण्यासाठी पाकिस्तानने समाज माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवरील छायाचित्र आणि व्हिडीओ हटविले.
भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या चिंधड्या उडवत एअरबेस क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट केले. पाकिस्तानी माध्यमे भारताकडून पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीचे वृत्त प्रसारित करीत होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतीय हल्ल्यात झालेल्या नुकसानीची दृष्ये दाखवण्यास पूर्णपणे प्रतिबंध लावला आणि तत्काळ नुकसानीचे छायाचित्र आणि व्हिडीओ हटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काही तासातच त्यांना हटविण्यात आले.
भारताकडून नूर खान हवाई तळ आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल येथील मुरीद हवाई तळ, शोरकोटमध्ये रफीकी हवाई तळ आणि रहीम खान हवाई तळाला लक्ष्य करून भारतीय लष्कराने यशस्वी कामगिरी केली. भारताच्या या हल्ल्याने चारही हवाई तळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताच्या कारवाईत चारही हवाई तळ उद्ध्वस्त झाल्याची पुष्टी केली.