जळगाव : जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे अंगावर वीज पडून हिराबाई गजानन पवार (३५) ही महिला ठार झाली. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. हिराबाई पवार यांचा परिवार शेतात वास्तव्यास होता. रविवारी दुपारी अचानक वादळवारा सुरू झाला. त्यात विजांच्या कडकडाट झाला. त्यावेळी हिराबाई यांच्या अंगावर वीज पडून त्या जागीच ठार झाल्या. त्यांच्या पश्चात पती, चार मुली असा परिवार आहे. तालुक्यात पहूर व शेंदुर्णी परिसरात रविवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
काम करताना विजेचा धक्का; कंत्राटी कामगाराचा मृत्यू
मुक्ताईनगर : महावितरणमधील कंत्राटी कामगार नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना ११ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रुईखेडा गावात घडली. नितेश हा कंत्राटदारामार्फत पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू झाला आणि त्याला जोरदार झटका बसला.
यामुळे तो पोलवरून खाली कोसळला. त्याला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नातेवाईक व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढले आहेत. विद्युत प्रवाह बंद न करता काम सुरू करण्याची परवानगी देणे म्हणजे सरळसरळ जीवाशी खेळ असल्याचे आरोप होत आहेत.