IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) सीझन १८ पुन्हा एकदा सुरू होत आहे, त्याची सुरुवात १७ मे रोजी आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने होईल. अंतिम सामना ३ जून रोजी खेळला जाईल. पण त्याआधी क्रिकेट साउथ आफ्रिकेने एक धक्का दिला आहे. सीएसएने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना २६ मे पर्यंत परतण्यास सांगितले आहे, यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या मुंबई इंडियन्स, आरसीबी, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्जसह ६ संघांचे नुकसान होईल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल. हा सामना ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होईल. क्रिकेट साउथ आफ्रिकेने संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना २६ मे पर्यंत परत येण्याचे निर्देश दिले आहेत. डेब्यूटीसी फायनलची तयारी करण्यासाठी खेळाडूंना पुरेसा वेळ मिळावा म्हणून हे केले आहे.
या संघांना धक्का
आयपीएल २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे एकूण २० खेळाडू वेगवेगळ्या संघांशी संबंधित आहेत. परंतु यापैकी ८ खेळाडू असे आहेत जे डब्ल्यूटीसीच्या अंतिम संघाचा भाग आहेत. यापैकी २ खेळाडू मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट आहेत.
कॉर्बिन बॉश (मुंबई इंडियन्स), रायन रिकेल्टन (मुंबई इंडियन्स), वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद), मार्को जानसेन (पंजाब किंग्ज), एडन मार्कराम (लखनऊ सुपरजायंट्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स) आणि ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स) यांचा WTC फायनल संघात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी फक्त सनरायझर्स हैदराबाद सध्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.
आम्हाला आमचे खेळाडू २६ मे पर्यंत इथे हवे आहेत – मुख्य प्रशिक्षक
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, परंतु भारत-पाकिस्तान तणावामुळे ५७ सामन्यांनंतर तो थांबवण्यात आला. आता त्याच्या अंतिम फेरीची तारीख ३ जून निश्चित करण्यात आली आहे, तर WTC अंतिम फेरी त्यानंतर फक्त एका आठवड्याने सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना २६ तारखेपर्यंत संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना ३० मे रोजी इंग्लंडला जाण्यापूर्वी पुरेसा वेळ मिळेल.
दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले, क्रिकेट संचालक (एनोक एनक्वे) आणि फोलेत्सी मोसेकी (सीएसए सीईओ) यांच्यात ही चर्चा सुरू आहे. पण सध्या तरी, मला वाटत नाही की आम्ही यावर माघार घेणार आहोत. आम्हाला आमचे खेळाडू २६ तारखेला परत हवे आहेत आणि आशा आहे की ते होईल.”