Repo Rate : रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात सलग दोन वेळा कपात केली आहे. यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा झाला आहे. अशात पुन्हा गृहकर्जदारांना आणखी आनंदाची बातमी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक ४,५ आणि ६ जूनला होणार असून, या बैठकीत आणखी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये सलग दोन वेळा रेपो दरात कपात केली होती. यामुळे रेपो रेट ६.५० वरुन आता ६.०० टक्क्यांवर आला आहे. याचा फायदा गृहकर्जदारांना झाला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक ४,५ आणि ६ जूनला होणार असून, या बैठकीत आणखी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांना आहे.
…तर रेपो दर 5.75 टक्क्यांवर
अर्थतज्ज्ञांनुसार, जर रिझर्व्ह बँकने पतधोरण समिती बैठकीत रेपो दरात पुन्हा कपात केली तर रेपो दर ५.७५ टक्क्यांवर येईल. एकूणच रिझर्व्ह बँकेकडून जेव्हा रेपो दर कमी केला जातो तेव्हा गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा होतो. बँकांकडून गृह कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात केली जाते. याचा फायदा नव्याने कर्ज घेणाऱ्यांना होतो किंवा ज्यांनी कर्ज रेपो दर प्रमाणे बदलणाऱ्या व्याज दरावर घेतलेले आहे, त्यांना देखील याचा फायदा होतो.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने आरबीआय इतर बँकांना कर्ज देते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, आरबीआय बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. आता जेव्हा आरबीआय बँकांना स्वस्त व्याजदराने कर्ज देईल, तेव्हा बँका त्यांच्या ग्राहकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदर देखील कमी करतील.