Weather Update : राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीलाच तप्त उन्हाचा तडाखा असतानाच, गत सप्ताहापासून बेमोसमी पावसाने थैमान घातले आहे. यात रब्बी हंगामातील केळी बागायती पिकांसह ज्वारी, बाजरी, मका आदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी शेतपिकांना मोठा फटका बसला असून, याचे पंचनामे होत नाहीत तोच, पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 17 मेपासून 25 मेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस हा दोन दोन दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या भागांमध्ये कोसळणार असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार असल्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दि. 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार आहे. राज्यात 20, 21 व 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळं देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र्रत, मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.