जळगाव : शेतातील कडब्याला आग लागून या आगीत पंडित डोमन रायसिंग (६५) या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अनवर्दे खुर्द, ता. चोपडा येथे शनिवारी दुपारी उघडकीस आली.
शेतकरी पंडित रायसिंग हे शनिवारी सकाळी हातेड शिवारातील आपल्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेतातील कडब्याला अचानक आग लागली. ते धुराच्या व आगीच्या तडाख्यात सापडल्याने होरपळून जमिनीवर कोसळले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पंडित हे दुपारपर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे घरातील मुले त्यांना बघायला शेतात गेली असता ते जळालेल्या व मयत स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच भाऊबंदांनी शेताकडे धाव घेत मृतदेह घरी आणला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली, असा परिवार आहे.
पावसामुळे भिंत कोसळून प्रौढाचा मृत्यू
चोपडा : शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एका घराची पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडली. यात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
मुसा खान उस्मान कुरेशी (६३), असे मृत इसमाचे नाव आहे. चोपडा शहरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील शेतपुरा भागात एका घराची भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडली. यात चार जण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेले मुसा खान कुरेशी यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नजमाबी मुसा खान कुरेशी (५९), दिलकीशबी शिराज खान शेख रियाज (३५) आणि शिरीन बी इम्रान खान कुरेशी (३०) हे जखमी झाले आहेत.