भारत व पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखण्यात आपण मोठी भूमिका बजावली, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला होता की ते अणुयुद्धाच्या अगदी जवळ पोहोचले होते, असेही ते म्हणाले. शुक्रवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी यासंदर्भात सांगितले. ते पुढे म्हणाले, परिस्थिती खूप गंभीर बनली होती. पुढचे पाऊल कोणते असते हे तुम्हाला माहिती आहे… ‘एन वर्ड’ म्हणजे अणुयुद्ध. परराष्ट्र धोरणातील यशाबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत-पाकिस्तान युद्ध रोखणे हे त्यांच्या सर्वांत मोठ्या यशांपैकी एक आहे. तथापि, त्यांना त्याचे श्रेय मात्र मिळाले नाही.
शांततेसाठी व्यापार…
ट्रम्प म्हणाले की, युद्ध थांबवण्याच्या बदल्यात आपण दोन्ही देशांसोबत व्यापार करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता मी हिशेब चुकता करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यवसायाचा वापर करत आहे.
भारत १०० टक्के कर कमी करेल
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी फॉक्स न्यूजवर दावा केला की भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क १०० टक्के कमी करण्यास तयार आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार आहे. मात्र, मी यासंदर्भात घाई करणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले. जगातील १५० देश अमेरिकेसोबत व्यापर करार करू इच्छितात. दक्षिण कोरियालाही करार करायचा आहे. आम्ही सर्वांशी तर करार करू शकत नाही. ट्रम्प यांनी ट्रेड डीलसाठी मर्यादा निश्चित करण्याबद्दलही भाष्य केले. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक म्हटले. ते म्हणाले की, भारतात व्यवसाय करणे जवळजवळ अशक्य आहे, परंतु भारत अमेरिकेसाठी शुल्क काढून टाकण्यास तयार आहे.