अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील महत्त्वाच्या बैठकीनंतर एका दिवसानंतर भारताने अफगाणिस्तानसोबत व्यापारी संबंध वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताने अफगाणिस्तानच्या १६० ट्रक्सना अटारी सीमेवरून प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. हे ट्रक प्रामुख्याने सुकामेवा घेऊन भारतात येतील.
१६ मे रोजी इराण आणि चीनच्या दौऱ्यावर असताना मुत्ताकी यांनी स्वतः जयशंकर यांना फोन केला होता. भारताने याला एक महत्त्वाचा राजनैतिक संकेत मानले आहे. तालिबानने केलेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल आणि पाकिस्तानने पसरवलेल्या अफवांना बळी न पडल्याबद्दल भारताने अफगाण नेतृत्वाचे आभार मानले २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट तात्पुरते बंद करण्यात आले होते.
यामुळे अफगाणिस्तानातून येणाऱ्या उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. १६ मे रोजी, भारत सरकारने सुक्या मेव्या घेऊन जाणाऱ्या पाच ट्रक्सना अटारी येथे पोहोचण्याची परवानगी दिली. जी पुरवठा मार्ग पुन्हा सक्रिय करण्याची सुरुवात मानली जात होती. आता एकाच वेळी १६० ट्रक्सना परवानगी दिल्याने भारत-अफगाणिस्तान व्यापारी संबंधांना एक नवीन चालना मिळाली आहे.
सुकामेवा घेऊन ट्रक्स भारताकडे रवाना
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव कमी झाल्यानंतर आणि युद्धबंदी झाल्यानंतर, शुक्रवारी अफगाणिस्तानातून आठ ट्रक अटारी एकात्मिक तपासणी चौकीतून भारतात दाखल झाले. २४ एप्रिलपासून पाकिस्तानातील लाहोर आणि वाघा सीमेवर अडकलेल्या १५० ट्रक्समध्ये हे समाविष्ट होते. या ट्रक्समध्ये प्रामुख्याने बदाम, अक्रोड इत्यादी सुक्या मेव्यांचा समावेश होता. हे ट्रक भारतीय व्यापाऱ्यांनी आगाऊ पैसे देऊन खरेदी केले होते. जर हे वेळेवर सोडले नाही तर ते खराब होण्याचा धोका होता.