---Advertisement---

धुळे पोलिसांनी रोखली गांजाची तस्करी, गोळी झाडणारा फरार आरोपी कट्ट्यासह जेरबंद

---Advertisement---

धुळे : कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १५ लाखांचा गांजासह कार असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मागील भांडणाच्या वादावरुन गोळीबार करणाऱ्या एका आरोपीकडून गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळे येथील सोलापूर सुरत महामार्गावरील मोराणे उड्डाणपुलाखाली धुळे तालुका पोलिसांनी कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील कार चालकाला दि. १६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. हा गांजा नाशिक येथे विक्रीसाठी घेऊन जात असतांना चालकाला ताब्यात घेतले. वाहनामधून १५ लाखांचा गांजासह कार असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. १६ रोजी दुपारी मोराणे गावातील उड्डाणपुलाखाली कार क्रमांक एमपी-०९ डीएन-११४७ पथकाने अडविली. कारची झडती घेतली असता गांजा आढळून आला.

संशयित चालक अंतरसिंग वेचान बरडे (वय २६, रा. बडवानी, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले. पथकाने कारसह १५ लाखाचा गांजा असा एकूण २१ लाख १६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर चालकाची चौकशी केली असता त्याने वाहनामधील गांजा नाशिक येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

आरोपी कट्ट्यासह जेरबंद

धुळे : मागील भांडणाचे वादावरुन शंभरफुटी रोडवरील अमन कॅफेत गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी बिलाल सुबराती शाह फरार होता. घटनेच्या पाच दिवसानंतर दि. १७ रोजी धुळ्यातच पोलिसांना तो गवसला. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील शंभर फुटी रोडवरील असलेल्या अमन कॅफेत शाहरूख बाबु शाह (वय२९ रा. मोगलाई साक्री रोड, धुळे) हा मित्रासोबत दि. १३ रोजी दुपारी चहा पिण्यासाठी आला होता. त्याठिकाणी संशयित आरोपी बिलाल सुबराती शाह (रा. काझी प्लॉट, धुळे) व त्यासोबत हाशिम मलक अब्दुल रहेमान (रा. मिल्लत नगर, धुळे) या दोघांनी फिर्यादीला जुन्या वादातून मारहाण करीत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संशयित बिलाल याने गावठी कट्ट्यातून फिर्यादीच्या पायावर गोळी झाडून दुखापती केले. संशयित हाशिम पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र मुख्य आरोपी बिलाल फरार होता. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून बिलालला गावठी कट्टासह दोन जिवंत काडतुससह अटक केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment