जळगाव : एरंडोल तालुक्यातील खर्ची खंजे येथे गिरणा नदी परिसरात एकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शरद रामा भिल (वय ४०, राहणार कामतवाडी, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. १६ मे रोजी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खर्ची, ता. एरंडोल येथील लक्ष्मण श्रावण ठाकरे यांच्याकडे शरद भिल हे (सासऱ्यांकडे) भेटीसाठी आले होते. १६ मे रोजी दुपारच्या वेळेस भिल हे गिरणा नदी खर्ची सुकेश्वर शिवारात कामानिमित्त गेले होते. घरी जात असताना अवकाळी वादळ व विजांचा कडकडाटदेखील सुरू होता. त्यातच वीज पडण्याची घटना घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. शरद भिल याला उपचारार्थ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील, महेंद्रसिंग पाटील यांच्या पथकाने कार्यवाही केली. दरम्यान, या घटनेमुळे कामतवाडी येथे शोककळा पसरली आहे.
आकाशात विजा कडाडताना काय कराल?
शेतात असताना आकाशात वीज कडाडू लागल्यास त्वरित शेतामधील शेड किंवा घराचा आसरा घ्या. पायाखाली प्लास्टिक किंवा गोणपाट, कोरडे लाकूड किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळ पायावर बसा. पोहणारे किंवा मासेमारांनी पाण्यातून बाहेर यावे व सुरक्षित आसरा घ्यावा, अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. तसेच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
काय काळजी घ्याल?
विजेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी बाहेर असल्यास, विजा चमकत असल्यास लगेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. बंद इमारत, घर किंवा बंदिस्त जागा यासारखी ठिकाणे सरक्षित मानली जातात. अशावेळी उंच ठिकाणी थांबणे टाळावे. उंच ठिकाणी जसे की झाड, विद्युत पोल किंवा पत्र्याचे शेड या ठिकाणी थांबणे टाळावे. धातूच्या वस्तूपासून दूर राहा, छत्री, चाकू किंवा भांडे यासारख्या धातूच्या वस्तूंपासून दूर राहा, गटात उभे राहणे टाळावे.
लाखाची मदत
आकाशी वीज कोसळून मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला शासनाकडून लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले जाते. तातडीची मदत प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला वितरित केली जाते.