चेतन साखरे
जळगाव: जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वेग धरू लागल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीला महायुती अत्यंत मजबूत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे नेतेच भुर्रर्र झाल्याने ‘टांगा पलटी घोडे फरार’ अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे निवडणुका लढण्यासाठी नेतृत्वाच्या पेचात पदाधिकारी पडले आहेत.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठे बंड होऊन सत्ता खालसा झाली. या बंडात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे तत्कालीन आ. चिमणराव पाटील, आ. लता सोनवणे, विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आणि आमदार किशोर पाटील अशा पाच जणांचा समावेश होता. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळात ऑगस्ट २०२३ मध्ये साहेबांच्या राष्ट्रवादीलाही खिंडार पडून अजित पवार महायुतीत सहभागी झाले. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या तिकिटावर एकमेव निवडून आलेले तत्कालीन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनीही त्या वेळी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. अवघ्या वर्षभरातच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्रात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र लोकसभेचा धडा घेत महायुतीने राज्यात लाडकी बहीण योजना आणली आणि हीच योजना महायुतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरली. महायुतीचे २८८ पैकी २३५ आमदार निवडून आल्याने महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. त्यात जळगाव जिल्ह्यात तर महाविकास आघाडीचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले.
महाविकास आघाडी कोमात
जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघ या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. महाविकास आघाडी अद्यापही या पराभवाच्या धक्क्यातून सावरली नसून कोमत असल्यागत स्थिती झाली आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठीदेखील महाविकास आघाडीकडे कार्यकर्तेच शिल्लक नाहीत.
नेते उडाले भुर्रर्र….
सत्तेशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे नेत्यांकडील कार्यकर्त्यांचा ओघ कमालीचा ओसरला होता. अखेर नेत्यांनी ठरवून टाकले आणि भुर्रर्र उडून गेले. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिग्गज माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह काही माजी आमदारांनी शरद पवारांना टाटा-बाय बाय करीत अजित पवारांच्या गटात प्रवेश केला, तर दुसरीकडे काँग्रेसचे हुकमी एक्के असलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील कन्येसह लोकसभा निवडणुकीआधी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती बिकटच झाली. ठाकरे गटाची कमान सांभाळणारे विष्णू भंगाळे यांनीही विधानसभा मतदानाच्या एकदिवस आधी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेते असे भुर्रर्र उडाल्याने सध्यातरी मविआची ‘टांगा पलटी घोडे फरार’ अशीच स्थिती आहे.
निवडणुका लढणार कुणाच्या भरवशावर ?
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील घटक पक्ष आपापल्या पध्दतीने तयारीला लागले आहेत. दुसरीकडे कोमात असलेल्या महाविकास आघाडीसमोर नेतृत्वावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसकडे नेतृत्वच शिल्लक नाही. शरद पवार गटाकडे आ. एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व असले तरी लोकसभेतील बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांनाही पेच पडला आहे, तर ठाकरे गटाची जबाबदारी घेतलेले माजी खासदार उन्मेश पाटील हे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मुंबईहून जळगाव अपडाऊन करणाऱ्या संपर्कप्रमुख संजय सावंतांविषयी कमालीची नाराजी आहे. त्यामुळे महायुतीचे आव्हान पेलताना निवडणुका लढणार कुणाच्या भरवशावर? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.