नंदुरबार : रेडकांनी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात तब्बल २६ रेडके मृत्युमुखी पडले. ही घटना रविवारी (१८ मे) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नवापूरच्या चरणमाळ घाटात घडली. या अपघातात ट्रक चालक देखील गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रानुसार, ३५ रेडकांनी भरलेला ट्रक ( क्रमांक जी.जे. 23, ए.टी 9272) नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरून सुरतच्या दिशेने जात होता. दरम्यान, रविवारी (१८ मे) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास तो नवापूरच्या चरणमाळ घाटात अनियंत्रित होऊन थेट कोसळला. या अपघातात तब्बल २६ रेडके मृत्युमुखी पडले. या अपघातात ट्रक चालकदेखील गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
या अपघातात ट्रकचे केबिन चक्काचूर झाले असून, मोहम्मद अली रोशन अली शेख रा.बस्तान, सुरत असे ट्रकचालकाचे नाव आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या २६ रेडकांना जेसीबीच्या साह्याने खड्डा करून त्याच ठिकाणी जंगलात दफन करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, चरणमाळ गटात अपघात नित्याचे झाले असून अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. अनेक जण अपघातग्रस्त अपंगत्व येत असल्याने मोठे नुकसान होत आहे. मात्र, घाट कटिंग आणि दुरुस्तीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने रखडला आहे.
एक क्विंटल अफूच्या बोंडांचा चुरा केला जप्त
विसरवाडी : बंदिस्त ट्रॉलीमधून एक क्विंटल अफूच्या बोंडांचा चुरा अर्थात अमली पदार्थ विसरवाडी पोलिसांनी जप्त केले. वाहनासह एकूण १९ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, धुळे-सुरत महामार्गावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या एका हॉटेलच्या प्रांगणात उभ्या असलेल्या ट्रॉलीमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाली होती. त्यांनी विसरवाडी पोलिसांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी लागलीच पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी संशयित ट्रॉली (जीजे २७ टीडी ३५८६) मिळून आली.
वाहनावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रूपचंद केसाराम (रा. नाथानियो का वास, ता. जि. बाडमेर, राजस्थान), असे सांगितले. त्यास ट्रॉलीच्या मागील बाजूस काय आहे, याबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्यावर संशय अधिक बळावल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात ताडपत्रीच्या आत चार प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये अफूच्या फुलांच्या बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) पथकास मिळून आल्याने चालकास ताब्यात घेतले.
एकूण ९९ किलो ७७५ ग्रॅम वजनाचा अफूच्या फुलांचे बोंडाचा चुरा अर्थात उग्र वास असलेला अमली पदार्थ व वाहन, असा एकूण १९ लाख ९८ हजार ८७५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रूपचंद याच्याविरुद्ध केसाराम विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार अनिल राठोड, निखिल ठाकरे, लिनेश पाडवी, रामचंद्र ठाकरे, दिनेश पावरा यांनी केली.