---Advertisement---

माती वाहतूकची माहिती ग्रुपवर टाकल्याचा राग, सरपंच पतीकडून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

---Advertisement---

यावल : तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती खोदकाम व वाहतुकीचा मुद्दा चिघळत चालला आहे. या प्रकरणात सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता सावदा येथील व्यक्तीस माती नेण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर आली होती. याबाबतची माहिती गावातील तरुण गोविंदा संजय कोळी यांनी गावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली. यामुळे सरपंच पती सुरज मनोहर पाटील यांनी गोविंदा कोळी यांना दारू पिऊन धमकावल्याचा आरोप गोविंदा कोळी यांनी केला असून त्यांनी याबाबत फैजपूर तालुका यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे सुरज पाटील यांनीही गोविंदा कोळी यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता परस्पर आरोप-प्रत्यारोपात अडकले आहे.

दरम्यान, यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे. काही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे याप्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. यात ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसेल,ठराव व ग्रामसभेचा अवमान केला जाईल आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जाईल तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होणारच अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

सदरहू सरपंचपती सुरज पाटील नेहमी दारूच्या नशेत ग्रामपंचायतच्या कामात नेहमी हस्तक्षेप करत असतो आणि पत्नीच्या पदाचा गैरफायदा घेत आहे असे गावातील उपसरपंच अलकाबाई कोळी,ग्रा.सदस्य पुनम पाटील,तुषार भोई,सुदेश बाविस्कर,पांडुरंग कोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.तरी पोलीस प्रशासन दोन्ही तक्रारींची चौकशी करत असून पुढील कारवाईसाठी पुरावे गोळा केले जात आहेत.गावातील नागरिकांनी संयम राखावा व कोणताही अफवा पसरवू नये असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment