जळगाव : जळगावसह राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परिणामी महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच जळगाव जिल्हयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका नृत्य शिक्षकाचे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर बळजबरीने धर्म बदलून तिच्यासोबत विवाह केला. पीडितेने तब्बल पाच वर्षानंतर सुटका केली असून, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित नृत्य शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, पीडित तरुणी सुरत येथील रहिवासी असून, ती २०१९ मध्ये अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात शिकत होती.
महाविद्यालयात स्नेहसंमेलन असल्याने तिने नृत शिक्षक जितेंद्र अनिल संदानशिव (वय ३३) याच्याकडे क्लास लावला होता.
दरम्यान, जितेंद्र याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.
पीडिता बारावी पूर्ण केल्यानंतर फार्मसी कॉलेज, पुणे येथे प्रवेश घेऊन ती मावशीकडे राहत होती. यावेळीही जितेंद्र याने विविध हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने बळजबरीने धर्म बदलून तिच्यासोबत विवाह केला.
पीडितेने तब्बल पाच वर्षानंतर सुटका केली असून, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित नृत्य शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.