---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. हवामान विभागाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात १२ जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून १२ ते १४ जूनदरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात ५ मे पासून भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) १० वेळा अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यात ९ वेळा ‘यलो अलर्ट’ तर एक वेळेस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले. त्यापैकी ६ वेळा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेले अंदाज खरे ठरले आहेत. तर ४ वेळा व्यक्त केलेले अंदाज फोल ठरले. जून महिन्यात ५ व ६ जूनदरम्यान अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, यादरम्यान पाऊसच झाला नाही.
वादळी वाऱ्यांचाही करावा लागणार सामना
जिल्ह्यात १२ जूनपासून पाऊस तर होणारच आहे. मात्र, त्यासोबतच ४० ते ५० किमी वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यांचाही सामना आता करावा लागणार आहे. राज्यात मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय झाला आहे.