---Advertisement---
जळगाव : सोने-चांदीच्या किमतीत सतत वाढ होत असून ही दरवाढ थांबवण्याचे नाव घेत नाहीय. घसरणीनंतर सलग भाववाढ होऊन चांदी सध्या एक लाख सात हजार २०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली आहे. तर सोने ९६ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ होत असलेले चांदीचे दर बुधवारी (११ जून) रोजी एक लाख सात हजार २०० रुपयांवर स्थिर राहिले तर सोने भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ते ९६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. गेल्या ११ दिवसांतील स्थिती पाहिली तर चांदी दरात नऊ हजार ७०० रुपयांची वाढ झाली आहे तर सोने केवळ ९०० रुपयांनी वाढले आहे.
मध्यंतरी सोने भावात अधिक वाढ होत असताना चांदीत किरकोळ चढ-उतार सुरू होता. त्यानंतर मात्र गेल्या ११ दिवसांपासून चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे तर सोने भावात किरकोळ चढ-उतार होत आहे. ३१ मे रोजी ९७ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २ जून रोजी ५०० रुपयांची वाढ झाली.
त्यानंतर ३ जून रोजी थेट दोन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख ५०० रुपयांवर जाऊन ती पुन्हा एकदा एक लाखाच्या पुढे गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ जून रोजी पुन्हा एक हजार १०० रुपयांची वाढ झाली.
५ रोजी १०० रुपयांची किरकोळ वाढ असताना ६ जून रोजी एकाच दिवसात चार हजार १०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख पाच हजार ८०० रुपयांवर पोहोचली. ९ जून रोजीच्या घसरणीचा अपवाद वगळता सलग भाववाढ होत जाऊन चांदी सध्या एक लाख सात हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आहे. दुसरीकडे ३१ मे रोजी सोने २७ हजार ६०० रुपयांवर होते. आता ते ९६ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आहे.