मुलीला भेटण्यासाठी ९० वर्षाच्या वृध्देने तीन चाकी सायकलने केला १७० किमीचा प्रवास

इंदोर : परिस्थितीने लाचार केलं की वय, शारिरिक अपंगत्व आदी कोणत्याची बाबी आडव्या येत नाहीत. मात्र अशा परिस्थितीतही आईचं आपल्या मुला-मुलींवर किती प्रेम असतं याचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीला भेटायला जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यातील अशोकनगर येथील ९० वर्षाच्या वृध्देने तीन चाकी सायकलने तब्बल १७० किमीचा प्रवास करत राजगढ जिल्ह्यातील पचोर येथील उदनखेडी या गावातील मुलीचे घर गाठले.

९० वर्षाच्या आजीला खूप दिवसांपासून आपल्या लेकीला भेटण्याची इच्छा होती पण तिच्याकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे या आजीने आपल्या तीन चाकी सायकलवरूनच लेकीला भेटायला जाण्यांच ठरवलं. आठ दिवसांत तिने १७० किमीचे अंतर पार करत लेकीचे गाव गाठले असल्याचा दावा या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन चाकी सायकल ढकलत ही आजी चालत आहे. तिच्या सायकलवर बरेचसे सामानसुद्धा टाकलेलं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून यावर नेटकर्‍यांनी भावनिक कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.