शेअर बाजारात मोठा भुकंप; १५ मिनिटांत ३.५ लाख कोटींचा चुरडा

मुंबई : तेलाच्या वाढत्या किमती, मध्यपूर्वेतील तणाव, जागतिक स्तरावरील नकारात्मक वातावरण आणि अमेरिकेतील रोखे उत्पन्नात वाढीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारात दिसून येत आहेत. सलग सहाव्या दिवशी भारतीय शेअर बाजार गडगडला. गुरूवारच्या सुरुवातीच्या सत्रात तीनही बेंचमार्क निर्देशांकात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. परिणामी मार्केटमधील गुंतवणूकदारांना १४.६० लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

गुरुवारी, सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ६०० अंक घसरून तर निफ्टी १९,००० अंकांच्या खाली आला आहे. सकाळी ९.४५ वाजता सेन्सेक्स ६११.१४ अंक किंवा ०.९५% घसरून ६३,४३७.९२ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही १९९.५० अंक किंवा १.०४% घसरणीसह १८,९२२.६५ अंकांवर आला. अशाप्रकारे घसरणीच्या सत्रामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ३.५८ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३०५.६४ कोटी रुपये झाले आहेत.

सेन्सेक्स समभागांमध्ये टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्रा शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड पाहायला मिळाली. तर टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि टाटा स्टील शेअर्सनाही तोटा सहन करावा लागला. दुसरीकडे, ॲक्सिस बँक, एचसीएचएल टेक आणि इंडसइंड बँक शेअर्सनी उसळी घेतली.

पाच दिवसात १४.६० लाख कोटी स्वाहा
यापूर्वी बुधवारी सलग पाचव्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजारांची घसरण राहिली. परिणामी मार्केटमधील गुंतवणूकदारांना १४.६० लाख कोटी रुपयांचा फटका बसला. सेन्सेक्स ५२२.८२ अंक किंवा ०.८१% घसरून ६४,०४९.०६ अंकांवर बंद झाला. अशाप्रकारे गेल्या पाच दिवसांत निर्देशांकात एकूण २,३७९.०३ अंकांनी घसरण झाली. मार्केटमधील सततच्या घसरणीमुळे बीएसई सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १४,६०,२८८.८२ कोटी रुपयांनी घटून ३,०९,२२,१३६.३१ कोटी रुपये झाले.