चांद्रयान-4 बद्दल मोठी अपडेट; वाचा काय म्हणाले इस्रो अध्यक्ष

श्रीहरीकोटा : चंद्रयान 3 मिशनच्या ऐतिहासिक यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आता पुढील चंद्र मोहिम चांद्रयान 4 साठी मोठी तयारी करत आहे. चांद्रयान-4 मोहीम केवळ चंद्राच्या पृष्ठभागावरच उतरणार नाही, तर तेथून काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. चांद्रयान-3 एकाच टप्प्यात प्रक्षेपित करण्यात आले. पण चांद्रयान- 4 दोन टप्प्यात प्रक्षेपित होणार आहे.

चांद्रयान-4 पहिल्या टप्प्यात पृथ्वीवरून प्रक्षेपित होणार आहे. यानंतर ते चंद्रावर उतरेल. चंद्रावरील सर्व कामे पूर्ण केल्यानंतर, ते पृथ्वीवर नमुने वितरीत करण्यासाठी प्रक्षेपित केले जाईल. प्रथमच प्रक्षेपणाच्या वेळी, चांद्रयान-4 चे एकूण वजन 5200 किलोग्रॅम असेल, तर जेव्हा चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल तेव्हा त्याचे वजन 1527 किलो इतके ठेवले जाईल. चांद्रयान-4 स्वतःसोबत पाच मॉड्यूल्स घेऊन जाईल.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, चांद्रयान- 4 मोहिमेत पाच अंतराळ यान मॉड्यूल समाविष्ट केले जातील. तसेच, दोन रॉकेटच्या मदतीने दोन टप्प्यात प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान- 4 मध्ये केवळ चांद्रयान- 3 मिशनप्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल नसतील तर दोन अतिरिक्त मॉड्यूल देखील असतील. हे दोन मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरील काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येतील.

इस्रो प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन LVM-3 तीन घटकांसह लॉन्च केले जाईल, ज्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल आणि एसेंडर मॉड्यूलचा समावेश असेल. प्रोपल्शन मॉड्यूल- चांद्रयान-3 मोहीम प्रमाणे, प्रोपल्शन मॉड्यूल चांद्रयान-4 ला चंद्राच्या कक्षेत नेईल. डिसेंडर मॉड्यूल- हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, जसे चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर चंद्रावर उतरले होते.

असेंडर मॉड्यूल- चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा केल्यानंतर ॲसेंडर मॉड्यूल लँडरपासून वेगळे होईल. ट्रान्सफर मॉड्यूल- हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून असेंडर मॉड्यूल घेईल आणि चंद्राच्या कक्षेतून बाहेर येईल. री-एंट्री मॉड्यूल- हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून घेतलेले नमुने पृथ्वीवर परत आणेल.