कोरोनाच्‍या नव्‍या व्हेरियंटबाबत मोठी अपडेट; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

कोरोना विषाणू नवा सब व्हेरियंट (COVID-19) JN.1 मुळे पुन्‍हा एकदा जगभरातील चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) या सब व्‍हेरियंटचा समावेश ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ यादीत केला आहे. यापार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. सर्व राज्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य केले जाईल. घाबरून जाण्याची गरज नाही तर आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन मंत्री मांडविया यांनी बैठकीत केले.

“संपूर्ण सरकार दृष्टिकोनासह सर्वांनी एकत्र काम करण्याची ही वेळ आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. हॉस्पिटलची तयारी, वाढलेली देखरेख आणि लोकांशी प्रभावी संवाद याच्या मॉक ड्रिलसह तयार राहणे महत्त्वाचे आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये दर ३ महिन्यांनी एकदा मॉक ड्रिल केले जावे. राज्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देतो. आरोग्य राजकारणाचे क्षेत्र नाही,” असे मांडविया यांनी या बैठकीत सांगितले.