पुणे : येथील शौर्य कांबळे (वय २) या बालकाने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. विशेषतः शौर्य कांबळे याने बालपणातच, म्हणचे अवघ्या दोन वर्षातच आपल्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने पाच राष्ट्रीय चिन्हे, दोन कविता, इंग्रजीची मुळाक्षरे, सात पक्षी, विविध गाड्या, मानवी शरीरातील विविध अंग, अवयव, फळे, भाज्या, रंग, हावभाव आदी गोष्टी बरोबर ओळखून त्या म्हणून दाखविल्या आहेत. यासाठी त्याच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नुकतीच करण्यात आली आहे.
शौर्यचे वडील खासगी कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर असून, आई सोनम खासगी कंपनीमध्ये प्रक्रियातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. याबाबत शौर्यचे बाबा मेघन कांबळे सांगतात, त्याचा जन्म झाला तेव्हा लॉकडाउन होते. त्यामुळे त्याला घराबाहेर घेऊन जाणे शक्य नव्हते.
अशात घरीच त्याला चित्रे दाखवून गोष्टींची ओळख करून देण्यास आम्ही सुरुवात केली. त्या गोष्टी पटकन समजतात आणि तो ते लक्षातही ठेवू शकतो, हे आम्हालादेखील हळूहळू समजू लागले. त्याच्या या बौद्धिक क्षमतेला एक योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून विविध पर्याय पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’बाबत समजले व त्याचे नाव यासाठी देण्याचे निश्चित केले.
पालकत्व हा अतिशय नाजूक पण तितकाच जिव्हाळ्याचा विषय. मोबाईल ही आजकाल गरज नसून, व्यसन होत चालले आहे असं म्हणत असताना लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे कठीण आहे. डिजिटल लर्निंगच्या काळात मोबाईल हे शिक्षणाचे नवे माध्यमदेखील आहे.
त्यामुळे माध्यमाचा योग्यरित्या वापर करून चांगल्या गोष्टी शिकवता येऊ शकतात, हेच आम्ही शौर्यच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एकत्र कुटुंबपद्धती हा पालकत्वातील अजून एक महत्त्वाचा विषय आहे. लहान मुलांशी आपण जितका संवाद साधू तितकेच ते अधिक शिकतात. – सोनम कांबळे, शौर्यची आईं