नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकीचा फोन नागपूर पोलिसांना आला होता. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री १२ वाजेच्या सुमारास फडणवीसांच्या घराची तपासणी केली. मात्र हा फेक कॉल असल्याचं तपासात समोर आलं आहे. दरम्यान हा खोडसाळपणा करणाऱ्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा इसम दुखावलेला होता. त्याने केवळ दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा फोन केला होता. त्याच्या कॉलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे कोणतीही वस्तू किंवा तथ्य तिथे आढळलेले नाहीत. धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करुन खंडणी मागणाऱ्या तसंच नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाला ताब्यात घेण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. बेळगावच्या तुरुंगातून जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाला ताब्यात घेऊन नागपूर पोलिसांचा विशेष पथक नागपूरला दाखल झालं आहे.
दरम्यान गडकरी यांच्या कार्यालयात धमकीच्या प्रकरणात जयेश पुजारीची चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चौकशीमध्येच आणखी काही आरोपी या प्रकरणात होते का, तसंच धमकीचा फोन करण्यामागे उद्देश्य काय होता हे स्पष्ट होणार आहे.