विसरवाडी-गंगापूर वळणवर मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, चार जखमी

नंदुरबार : बेजबाबदार रस्त्याच्या कामामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधीत काम लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अनेक संघटना व नागरिक वेळोवेळी आंदोलन करत आहेत. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष असून आज बुधवारी पुन्हा मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर गेल्या आठ वर्षापासून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी ठेकेदाराद्वारे रस्ता अर्धवट करून वनवे मधूनच दोन्ही साईडहुन वाहने ये-जा करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.  दरम्यान, विसरवाडी आणि गंगापूर वळण रस्त्यातील पुलाजवळ एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूची वाहने सुरु असून आज बुधवारी दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात आयशर टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची प्रत्यक्ष दर्शनीनी माहिती दिली आहे. तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेत जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. या अपघाताबाबत विसरवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर गेल्या आठ वर्षापासून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक अपघात घडत आहे. त्यामुळे संबंधित काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.