मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई पालिकेचे दोन अधिकारी रात्री साडेअकरानंतर पोलीस स्थानकात दाखल झाले. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून एन. एम. जोशी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदा पद्धतीने आणि शासकीय कामात अडथळा आणून डिलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या पुलाचे काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले होते. मात्र, अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदा असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचे उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.
मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हे काम रखडल्यामुळे गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित होते. या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर आणि स्नेहल आंबेकर हे मुख्य आरोपी आहेत. तसेच इतर १५ ते २० अनोळखी लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.