बालपणीची आखाजी (अक्षय्यतृतीया)

प्रासंगिक 

लतिका चौधरी 

आजही हृदयाच्या कोपर्‍यात घर करून आहे. ते बालपण आजही मनाला मोरपिसाचा मुलायम स्पर्श करून जाते. त्या मोरपंखी आठवणीतील एक आठवण म्हणजे बालपणीची आखाजी. चैत्र वैशाखातील गौराई (गौर) बसवणे हा अविस्मरणीय सण असायचा. महिनाभर रोज बालसख्यांनी सकाळी एकत्र येणे, झाडाचा झोका, गाणी, झगडणे आजही मनात पिंगा घालते. चैत्र पौर्णिमेला सर्व गल्लीतल्या गावच्या मुली गौराई बसवत असू. लाकडाची गौर, प्रतिमा न्हावूमाखू घालून लाल वस्त्र पाटावर टाकून पूजा करून बसवत असू. हळद,कुंकू, अक्षता वाहून फुलहार चढवला जायचा. गौराईच्या दिवसात सकाळी लवकर जागायचो. तांब्याचा तांब्या मातीने, राखेने चकचकीत घासायचा. त्यात पानी भरायचे. नागवेलीची किंवा आंब्याच्या झाडाची पाने तांब्याच्या तोंडावर ठेवायची. मध्ये बसेल असा काळ्या चिकण्या मातीचा घट्ट गोळा पानाच्या मध्ये ठेवायचा. त्यावर सुती कापड ठेवून कोरडी माती गाळून चिकन लेप द्यायचा.तांब्याच्या भोवती चंदन, हळदकुंकुची बोटे ओढायची. नारळा शिवायचा हा बालपणीचा मंगलकलश असायचा. रुमालाची किंवा जुन्या फडक्याची चुंबळ डोक्यावर ठेवून त्यावर कलश ठेवायचा. डोक्यापेक्षा चुंबळ मोठी असायची. गल्लीतील सर्व बालसख्या एकत्र जमायचो. हातात टिपर्‍या घेऊन गौराईची गाणी म्हणत नदीवर ‘पाणी आणायला’ निघत असू. त्या नदीवरून कलश भरून आणलेल्या पाण्याने गौराई न्हाणवायचो. अमरावती व भोगावती या दोन नद्यांच्या डाच्यात’ (तोंडात) वसलेले गाव म्हणून आमच्या गावाचे नाव ‘धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा’. अमरावती नदी राहत्या घरापासून लांब म्हणून जवळच्या भोगावती नदीत. नदीच्या पुढील आमराईत गौर खेळायला, ‘पानी भरायला’, टिपर्‍या खेळायला जायचो. आम्ही सख्या-स्कर्ट, परकर पोलकी घालून, हातात नया पैशाच्या प्लास्टिकच्या रबरी बांगड्या, गळ्यात द्राक्षरंगाचे काचेच्या मण्यांची माळ, कानात साधे डूल, पायात गिल्लटचे काळेकुट्ट चाळ (पैंजण) असे काचकथिलही सोन्याचा, हिर्‍यामोत्याचा आनंद देत असे. अर्थात ते माहीतही नव्हतं. तो आनंद, ते रमणीय बालपण, तो निरागसपणा, निष्पाप जगणं सोन्याचं आयुष्य घडवत होतं. हसत खेळत, नाचत गात, टिपर्‍या खेळत महिनाभर मजा करायचो. महिनाभर रोज गौराईला वेगवेगळी माळ (हार, सर) करून गळ्यात घातली जायची. जसे-मुरमुरे, शेव, भुईमूग शेंगा माळ, डांगरच्या बियांची माळ, टरबूज बियांची माळ केल्या जायच्या. वैशाख द्वितीयेला कुंभाराघरी वाजतगाजत सन्मानाने ‘शंकर’ आणायला जायचो. मोठ्या वहिनीचा, बहिणीचा, आईचा डगला पोलका किंवा फ्रॉकवरच साडी गुंडाळून मुरडत चालत असू. ‘शंकर’ आणण्यासाठी ताट घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षता, पांढर्‍या कापडाच्या चिंध्याना हळद लावून पिवळे करून फेटा, धोती, उपरणे बनवण्यासाठी न्यायचो.

गौरी कलश

पुढील ’धान्या’ पूजेला असायच्या. कुंभाराला याने ’शंकर’ (काळ्या मातीचा) घडवला म्हणून मोबदला नया पैसा, एक पै, दोन पै, तीन पै, पाच पैसा, दहा पैसेपैकी नाणे रुपात द्यायचो. कुंभाराघरी पोरींची झुंबड असायची.

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी घरात ‘घागर’ पुजली जायची. घागरमध्ये पाणी, पाण्यात हळद, कुंकू, अक्षता, फुल, नाणं टाकून आंब्याच्या डहाळ्या, त्यावर ताटात पुरणपोळी, आंब्याचा रस, सार भात, रंगीत कुरडया पापड, भजे ठेवले जायचे. डांगर छोट्या कळसावर पूजेला असायचे. पितर पूजा, सवाष्ण पूजा व्हायची. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन उत्साहाने, आनंदाने सण साजरा होत असे.आम्ही बच्चे कँपनी अंगणातल्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून झोके घ्यायचो, खायचो. कधी आईच्या मांडीवर, कधी मोठ्या बहिणीच्या मांडीवर बसून झोके खाण्यात स्वर्गानंद असे. सासुरवाशिणी माहेरी आलेल्या मुली, आम्ही लहान मोठ्या मुली, आई, गल्लीतल्या बाया सर्व आखाजीची गाणी म्हणायचो.

१) चैत्र वैशाखाचं ऊन व माय…
२) आथानी कैरी तथानी कैरी…
३) गेली माळीच्या मळ्यात माझी गौराई

अशी अनेक गाणी पोरी, वयस्क बायका, मुली तालासुरात म्हणायच्या. आम्ही त्यांच्यामागे सूर धरायचो. ते सूर धरता धरता ते संस्कार, भाव अलगद मनावर अक्षय्य कोरले गेले.

गौराई, आखाजीची सांगता, निरोप संध्याकाळी म्हणजे तिसर्‍या प्रहरला व्हायचा. दोन नद्यांच्या ऐलाड पैलाडच्या (दोन्ही काठावरच्या ) मुली, बायका गौराई घेऊन विसर्जनासाठी यायचो. हातात टिपर्‍या घेऊन धोबी घाटावर, आमराईत समोरासमोर झुंडीने यायचो. दोन गट पडायचे. दोन्ही गटातल्या मुली, बायका एकमेकींना गाण्यातून शिव्या घालत भांडायच्या. एकमेकांना टिपर्‍या दाखवायच्या. गाण्यातून शिव्या घालण्यात मोठ्ठी चढाओढ असायची. पण त्या भांडणात वैर, द्वेष, सुड असे काही नसून खेळकरपणा असायचा. तर नदी पैल्याडच्या मुली टिपर्‍या ठोकत, कंबर खोचत ’झगडण्यासाठी’ तयारीनिशी उतरायच्या.

महिनाभरची एकत्र येऊन केलेली धमाल, गाणी, मस्ती सारं सारं मनात कितीतरी दिवस रेंगाळत रहायचं. खूप दिवसांपर्यंत पोकळी जाणवायची. खूप सारं हरवल्यागत वाटत रहायचं. आज ते दिवस, ते बालपण, त्या मैत्रिणी, गाणी, सण, उत्सव, हसणे, खिदळणे, राग, रुसवाफुगवा, जिव्हाळा, झोका, ओव्या, गौराई, भुलाबाई, सारंच फक्त आणि फक्त आठवणीत उरलं आहे.

मो. नं  9326656059