किरकोळ वाद : दोन गटात तुफान हाणामारी, संतप्त जमावाने केली वाहनांची तोडफोड

धुळे : किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना जुन्या धुळ्यात गुरुवारी रात्री ११ वाजता घडली. तसेच संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी परस्परविरोधात आझादनगर पोलीस तक्रार दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलीस सूत्रानुसार, प्रतीक उर्फ मल्ल्या बडगुजर याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोबाईलवरुन आकाश गणेश परदेशी याने फोन करुन तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. नंतर रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घरावर दगडफेक करून जमाव चालून आला.

घराबाहेर आल्यानंतर प्रतीकला बेसबॉल, हॉकीस्टीकने मारहाण करण्यात आली. तसेच अंगणतील दोन चारचाकी वाहन, तीन मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. त्याच्या फिर्यादीवरुन आकाश परदेशी, निखील बडगुजर, दिगंबर माळी, सागर परदेशी, दर्शन चौधरी, दर्शन माळी, प्रथमेश काळे, नंदू परदेशी, शिवम परदेशी यांच्यासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परस्परविरोधी कुंदन रवींद्र शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तो वरखेडी रोडने पायी जात असताना रिंक्कू बडगुजर, मल्ल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे, भूषण माळी आणि हर्षल महाचार्य हे गर्दी करुन त्याच्या जवळ आले. त्यांनी आकाश परदेशी सोबत का राहतो म्हणत वाद घातला.

यावेळी मल्ल्या बडगुजर याने त्याच्या जवळील चाकू सारख्या वस्तूने छाती व खांद्यावर वार केला. यात कुंदन जखमी झाला. तर रिक्कु आणि सागर याने लाकडी दांड्याने व इतरांनी हातबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या फिर्यादीवरुन रिक्कू बडगुजर, मल्ल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे, भूषण माळी व हर्षल महाचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.