चक्क पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत…

तरुण भारत । २५ जानेवारी २०२३। उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात मंगळवारी  मोठी दुर्घटना घडली. पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

हि दुर्घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात हजरतगंज येथील वजीर हसन रोडवर घडली. वजीर हसन रोडवर उभी असलेली पाच मजली अलया अपार्टमेंट अचानक जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत सपा नेते अब्बास हैदर यांच्या आई आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. ढिगाऱ्याखाली १६ पेक्षा जास्त लोक अडकून आहेत आणि त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरु आहे. ही घटना घडली तेव्हा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस,अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या घटनेनंतर आता संबंधित इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. संबंधित बिल्डरर्सनी इमारतीच्या बांधकामासाठी निकृष्ठ दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित इमारतीच्या बांधकामाबद्दल योग्य परवानग्या न घेता ती इमारत बांधण्यात आली होती. पैसे कमवण्यासाठी विकसकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयोग केला. लोकांचा विश्वासघात केला. विशेष म्हणजे फक्त 9 इंचच्या पिलरवर तब्बल 5 मजली इमारत बांधली, असा आरोप करण्यात येतोय.

विशेष म्हणजे इमारतीच्या तळाखाली अनधिकृतपणे लग्नाचा हॉल बांधण्याची योजना बिल्डरची होती. इमारतीच्या विकासकांचं नाव याजदान बिल्डर असं आहे. मालिक सायम आणि फहद यजदानी हे याजदान बिल्डरचे मालक आहेत. या बिल्डर्सच्या ग्रुपमध्ये अलीम चौधरी, सराफत अली हे डायरेक्टर आहेत.