गायीने खाल्ले ४० किलो प्लास्टिक, असं मिळालं गायीला जीवदान

नंदुरबार : एका गायीच्या पोटातून 40 किलो प्लास्टिक काढून तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे. तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पशुप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. शहादा शहरात हाप्रकार घडला आहे. दरम्यान, संकल्प ग्रुपच्या सामाजिक कार्यातून त्या गायीला जीवदान मिळाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकल्प ग्रुपच्या सदस्यांना सोनार गल्लीतील अल्पेश सोनार यांच्या घराच्या पाठीमागे एक गाय चारा खात असून आजारी असल्याची माहिती मिळाली या ग्रुपचे सदस्य शिवपाल यांनी अन्य सदस्यांसह त्या ठिकाणी जाऊन गायीची पाहणी केली. त्यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्या गायीवर उपचार करण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्या गायीच्या पोटामध्ये काहीतरी आहे, असा निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी काढला. व त्या गाईवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले.

शहादा तालुका लघु पशुसंवर्धन चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.संजय धामणकर यांच्यासह देवेंद्र देवरे, ओंकार राठोड, केतू चकणे यांच्या पशुवैद्यकीय पथकाने गायीवर शस्त्रक्रिया केली. तिच्या पोटातून 40 किलो प्लास्टिकची घाण निघाली व गायीचे प्राण वाचविण्यात पथकाला यश आले. गायीची प्रकृती स्वस्त आहे. गायीची शस्त्रक्रिया करतांना अल्पेश सोनार, प्रदीप सामुद्रे, तसेच संकल्प ग्रुपचे सदस्य शिवपाल जांगिड, प्रशांत कदम, ललित पाटील, स्वरूप लुंकड, प्रमोद मोरे, विजय चव्हाण, राकेश बोरा आदी उपस्थित होते.

दरम्यान, सर्व रस्त्यावर अथवा कोठेही प्लास्टिक कचरा टाकू नये भुकेने व्याकुळ असलेली जनावरे अन्नासोबत प्लास्टिक खातात. परिणामी प्लास्टिक पोटात जाऊन पशुंचा जीव जाऊ शकतो असे संकल्प ग्रुप व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.