जळगाव : शहरातील सराफ बाजार परिसरातील मनिष ज्वेलर्समध्ये टॉमिने वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे 2 लाख 30 हजाराचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी लक्षात आली. या प्रकारामुळे सराफ बाजार परिसरात व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
थंडीचे प्रमाणे वाढी बरोबर चोर्यांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे लक्षात येते. सराफ बाजारात भवानी मंदिरानजीक ललीत घोसुलाल वर्मा यांचे मनिष ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सोमवारी रात्री ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी टॉमिने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला.
सकाळी लक्षात आला प्रकार
सकाळी या संदर्भात दुकान मालकांनानजीकच्या काही नागरिकांनी घटनेबाबत माहिती दिली असता त्यांनी धावत येऊन पाहिले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलीसांना ही माहिती कळविली. पोलिसांनीही तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथक पाचारण केले होते मात्र त्याचा उपयोग होऊ शकला नाही.
चोरटयांनी दुकानातून १२ जोडी कानातले त्यांची किंमत ८० हजार रुपये इतकी आहे., तसेच ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे पँडल , ५० हजार रुपये किमतीचे विविध चांदीचे दागिने, २० हजार रुपये रोकड असा २ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.
घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदिप गावीत, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यंक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण व अन्य अधिकार्यांची भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी दुकान मालक ललीत वर्मा यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सराफ बाजारातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून या भागात बंदोबस्त वाढवावा अशी मागणी केली जात आहे.